- संपादकीय
- एपस्टीन प्रकरणावरून ट्रम्पवरच संतापले MAGA समर्थक — देशभरात राजकीय गोंधळ
एपस्टीन प्रकरणावरून ट्रम्पवरच संतापले MAGA समर्थक — देशभरात राजकीय गोंधळ
"स्वच्छता मोहिम" आणि "सत्य बाहेर काढू" अशा घोषणा करत सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या स्वतःच्या MAGA समर्थक गटाकडून (Make America Great Again) टीकेचा धनी बनले आहेत — आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एकच नाव: जेफ्री एपस्टीन.
एपस्टीन — एक गुंतवणूकदार, बाल लैंगिक तस्करी प्रकरणातील गुन्हेगार आणि बड्या लोकांशी संबंध असलेला — त्याच्या मृत्यूनंतरही अमेरिकन राजकारणात खळबळ माजवत आहे. ट्रम्प यांनी वर्षानुवर्षे दावा केला होता की ते अध्यक्ष झाल्यावर एपस्टीनची "क्लायंट लिस्ट" (ग्राहक यादी) सार्वजनिक करतील आणि या बाल तस्करी रॅकेटमधील मोठ्या नावांचा पर्दाफाश करतील. त्यांनी सूचित केले होते की लोकशाही पक्ष (Democratic Party) यामागे होता, आणि हा पक्ष त्याच्या श्रीमंत व सत्ताधारी नेत्यांना वाचवण्यासाठी सगळी माहिती दडपून ठेवत होता.
पण आता ट्रम्प स्वतःच म्हणत आहेत की, "ते फक्त राजकीय भाषण होतं" — म्हणजेच "जुमला" होतं. पाम बॉन्डी, ट्रम्प प्रशासनातील अटर्नी जनरल, जिच्या टेबलवर ही यादी असल्याचं काही काळापूर्वी सांगितलं जात होतं, ती यादी आता "गहाळ" झाली आहे, असे सांगितले जात आहे.
"जुमला" निघाल्याने संतप्त झाले MAGA समर्थक
FBI संचालक काश पटेल यांनी जाहीरपणे सांगितले होते की एपस्टीनची यादी प्रसिद्ध करणे हे त्यांचे "जीवन ध्येय" आहे. पण आज त्यांच्या सोशल मीडियावरही याबाबत पुर्ण शांतता आहे. ट्रम्प समर्थक आता चिडून विचारत आहेत — "जर ही यादी खोटी होती, तर एवढी वर्षे आम्हाला खोटे स्वप्न का दाखवले?" टेस्लाचे प्रमुख एलन मस्क, जे ट्रम्पचे पूर्वीचे समर्थनकर्ते होते, त्यांनीही आता ट्रम्पवर टीका सुरू केली आहे. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की "ट्रम्पचे नावच एपस्टीनच्या यादीत आहे", आणि त्यामुळेच यादी दडपली जात आहे.
DOJ चा खुलासा, पण शंका अधिक वाढल्या
याच आठवड्यात अमेरिकेच्या न्याय विभाग (DOJ) आणि FBI ने एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून स्पष्ट केलं की कोणतीही "क्लायंट लिस्ट" सापडलेली नाही, आणि एपस्टीननेच आत्महत्या केली होती. पण नवी फुटेज प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा चर्चेचा भडका उडाला — एपस्टीनच्या कोठडीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मिनिटाचा गॅप आहे. त्या रात्री त्याचे सहकारी बंदीवान देखील हटवण्यात आले होते, आणि फुटेज हरवले, असे स्पष्ट झाले.
"मोसाद"वर संशय, परदेशी हस्तक्षेपाची शक्यता
या सगळ्या प्रकरणात इस्रायली गुप्तचर संस्था "मोसाद" च्या भूमिकेवरही आता चर्चा सुरू आहे. एपस्टीनच्या भागीदार गिसलेन मॅक्सवेल हिचा वडील रॉबर्ट मॅक्सवेल याचेही मोसादशी संबंध असल्याचा संशय पूर्वीपासून आहे. समोर आलेल्या तपशीलांनुसार, एपस्टीन आणि त्याची टीम अमेरिकन राजकारण्यांची गुप्त माहिती गोळा करून ब्लॅकमेल करत होती, असा दावा केला जात आहे. त्यामुळेच, "अमेरिका नेहमीच इस्रायलच्या बाजूने का झुकते?" असा प्रश्न आता पुन्हा समोर येतो.
काश पटेल आणि त्याची गर्लफ्रेंड संशयाच्या भोवऱ्यात
FBI संचालक काश पटेल याची २६ वर्षांची गर्लफ्रेंड अॅलेक्सिस विल्किन्स ही एका माजी इस्रायली लष्करी अधिकाऱ्याच्या कंपनीत काम करत असल्याचे आता सोशल मीडियावर उघड झाले आहे. ही संबंध फक्त वैयक्तिक आहेत का, की गुप्तचर यंत्रणेचा भाग आहेत? असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत. सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे की काश पटेल हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत का?
राजकीय खळबळ आणि MAGA चा संताप
MAGA समर्थक आता ट्रम्प, पाम बॉन्डी आणि काश पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याच आठवड्यात DOJ च्या निवेदनानंतर बॉन्डीवर टीका वाढली आहे की तिने फक्त "आश्वासने दिली, कृती काहीच केली नाही." Elon Musk आणि अनेक स्वतंत्र माध्यमांनी देखील पुन्हा एकदा मागणी केली आहे — "क्लायंट यादी प्रसिद्ध करा."
राजकारण, द्वेष, आणि सत्तेचा खेळ
जेफ्री एपस्टीनची केस फक्त लैंगिक तस्करीची कथा नाही. ती एक राजकीय, सामरिक, आणि गुप्तचर यंत्रणांचा खोलवर गुंता आहे. आजही प्रश्न तोच आहे "जेफ्री एपस्टीनने अल्पवयीन मुली कोणासाठी पुरवल्या?" याचे उत्तर अजून मिळालेले नाही. आणि जेपर्यंत ते मिळत नाही, तोपर्यंत हे प्रकरण अमेरिकन राजकारणाला आणि जनतेला अस्वस्थ करत राहणार आहे.
000