- राज्य
- 'महापालिका हद्दीत इमारतींना मराठी नाव द्या'
'महापालिका हद्दीत इमारतींना मराठी नाव द्या'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवी मागणी
पुणे: प्रतिनिधी
महापालिकेच्या हद्दीत नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींना मराठी नाव देणे बंधनकारक करावे, अशी नवी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुढे आली आहे.
यापूर्वी त्रिभाषा सूत्रानुसार पहिलीपासून हिंदी शिकण्याची सक्ती करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला मनसे कडून ठाम विरोध करण्यात आला. या मुद्द्यावर मनसेला शिवसेना ठाकरे गटाचीही साथ मिळाली आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे बंधू तब्बल 19 वर्षानंतर एका मंचावर आले.
मनसे सह समाजाच्या विविध स्तरावरून हिंदीच्या सक्तीला विरोध झाल्यानंतर सरकारने याबाबतचे शासन आदेश सध्या तरी मागे घेतले आहेत. या यशाच्या पार्श्वभूमीवर मनसे मराठी बाबतीत अधिक आक्रमक झाली आहे.
महापालिका हद्दीत नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींना मराठी नावे देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पुणे महापालिकेला दिले आहे. इमारतींच्या बांधकामाला परवानगी देतानाच महापालिकेने मराठी नाव देणे बंधनकारक करावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.