- राज्य
- 'राहुल गांधी यांचे आरोप म्हणजे पराभवासाठी शोधलेले कारण'
'राहुल गांधी यांचे आरोप म्हणजे पराभवासाठी शोधलेले कारण'
देवेंद्र फडणवीस यांनी उडवली खिल्ली
पुणे: प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादी बद्दल केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. ठरवून घेतलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे ते बोलत आहेत आणि त्यामुळे लोकांची चांगली करमणूक होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे.
पायाभूत प्रकल्पांच्या वेगवान आणि दर्जेदार उभारणीच्या दृष्टीने संबंधित घटकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीमधील घोटाळ्याच्या आरोपाचा पुनर्विचार करीत त्यासंबंधीचे पुरावे देखील सादर केले. लोकसभा निवडणूक ते महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक या काळात एक कोटी मतदारांची वाढ, एकाच पत्त्यावर तब्बल 80 मतदारांची नोंद, मतदार यादीत नोंदवलेले पत्ते अस्तित्वात नसणे, एकाच मतदाराने चार मतदार केंद्रात केलेले मतदान, सत्तर वर्ष वय असलेल्या महिलेची नव मतदार म्हणून नोंदणी, असे अनेक प्रकारचे पुरावे गांधी यांनी सादर केले. त्याचप्रमाणे डिजिटल मतदार यादी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील केली.
मात्र, राहुल गांधी यांच्या आरोपांमध्ये गांभीर्य नसल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. मतदार यादी मध्ये घोटाळे आहेत हे आमचे देखील म्हणणे आहे. आम्ही ते दीर्घ काळापासून म्हणत आलो आहोत. मतदार याद्यांचा व्यापक स्वरूपात आढावा घेण्यात यावा, अशी आमची ही मागणी आहे. ती नुकतीच निवडणूक आयोगाने मान्य केली असून बिहारमध्ये अशा प्रकारे आढावा घेण्यास सुरुवात देखील केली होती. त्याला मात्र राहुल गांधी यांचा विरोध आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आमच्याकडे असताना नेहमीच पहिल्या रांगेत होते. आम्ही मागे होतो पण ते पुढे होते. आता मात्र प्रत्येक भाषणात दिल्ली पुढे मान तुकवणार नाही, दिल्लीकरांना पायघड्या घालणार नाही, अशी वर्धना करणाऱ्यांची स्थिती बघून वाईट वाटते, असा उपरोधिक टोला फडणवीस यांनी सहाव्या रांगेत बसणाऱ्या ठाकरे यांना लगावला.
पेटाने आम्हाला शिकवू नये ते त्यांचे काम नाही
नांदणी मठात असलेल्या महादेवी हत्तीण वनतारा प्रकल्पातच राहू द्यावे. तिथे तिला आवश्यक असलेले उपचार आणि सुविधा मिळत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने देखील तिला तिथेच ठेवण्याची भूमिका घ्यावी, असे प्राणी हक्कांवर काम करणाऱ्या पेटा या संस्थेने सुचविले आहे. मात्र, महादेवीला वनतारामध्ये मिळणाऱ्या सुविधा जर आम्ही कोल्हापुरात उपलब्ध करून देणार असलो तर तिला वनतारामध्ये ठेवण्याचा आग्रह पेटाने धरू नये. त्यांनी आम्हाला शिकवायला जाऊ नये. ते त्यांचे काम नाही, असेही फडणवीस यांनी सुनावले.
पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न प्राधान्यक्रमावर
पुणे शहरातील वाहतूक समस्या दूर करण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामध्ये तब्बल 22 चौरस किलोमीटर क्षेत्राचा विचार करण्यात आला आहे. त्यात अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याच्या नियोजनाचा व्यापक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. खाजगी वाहने कमीत कमी प्रमाणात रस्त्यावर यावी यासाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा अधिकाधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर 30 ते 50 टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी बसेसची संख्या दोन हजार वरून सहा हजार पर्यंत वाढवली जाईल. सर्वसाधारणपणे महानगरात वाहतुकीचा वेग ताशी 30 किलोमीटर असला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. सध्या पुण्यात वाहतुकीचा वेग ताशी 12 ते 15 किलोमीटर इतका कमी आहे. त्यादृष्टीने रस्ता रुंदीकरण, वर्तुळ मार्ग या सर्व पर्यायांचा विचार करण्यात आला आहे. वाहतुकीबाबत तातडीच्या उपाययोजनांसंदर्भात पुणे आणि पिंपरी चिंचवड चे पोलीस व महापालिका आयुक्त यांनी सादरीकरण केले आहे. त्यानुसार तातडीच्या उपाययोजनांची देखील अंमलबजावणी केली जाईल. जुन्या पुण्यातले रस्ते अरुंद असल्याने आणि त्याचे रुंदीकरण शक्य नसल्याने बोगद्यांच्या माध्यमातून वाहतुकीचा वेग वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.