- देश-विदेश
- नागालँडमधील सात आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
नागालँडमधील सात आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का तर सत्ताधाऱ्यांना पूर्ण बहुमत
नवी दिल्ली: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागालँड मधील सात आमदारांनी पक्षाला रामराम करून सत्ताधारी नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून सत्ताधारी पक्षाला मात्र पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे.
नागालँड विधानसभेत 12 जागा मिळून राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेतील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष हे स्थान प्राप्त केले होते. अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बंडाचे निशाण उभारून अजित पवार यांनी पक्ष हस्तगत केला त्यावेळी नागालँड मधील आमदारांनी अजितदादांची पाठराखण केली.
आता मात्र नागालँडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे निम्म्याहून अधिक आमदार एनडीपीपीमध्ये गेले आहेत. विधानसभा अध्यक्ष शरिंगैन लाँगकुमैर यांनी हे पक्षांतर संविधानाच्या अनुसूची 10 शी तसेच नागालँड लोकप्रतिनिधी कायद्याशी सुसंगत असल्याचे स्पष्ट करून या पक्षप्रवेशाला मान्यता दिली आहे.