- राज्य
- दिव्या देशमुखवर अभिनंदनाचा वर्षाव
दिव्या देशमुखवर अभिनंदनाचा वर्षाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छा
नागपूर: प्रतिनिधी
महाराष्ट्रकन्या दिव्या देशमुख हिने अवघ्या १९ व्या वर्षी महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. जॉर्जिया येथे बटुमी येथे झालेल्या स्पर्धेत तिने केलेल्या उज्ज्वल कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
अनुभवी भारतीय बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी हिचा दिव्याने पराभव करून महिला विश्वचषकावर आपले नाव कोरले. दोन भारतीय उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडूंचा अंतिम सामना आणि त्यात दिव्याने मिळवलेला विजय आणि ग्रँड मास्टर किताब अभिमानास्पद आहे, असे पंतप्रधानांनी दिव्याचे अभिनंदन करण्यासाठी केलेल्या आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिव्याचे अभिनंदन केले. तिची कामगिरी अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे दिव्याचा विशेष सन्मान करण्याबरोबरच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून दिव्याचे अभिनंदन केले आणि तिला क्रीडा क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज ठाकरे यांनी प्रदीर्घ पोस्ट करून दिव्याचे कौतुक केले. महाराष्ट्रात बुद्धी आणि बळ दोन्ही ओतप्रोत आहे. त्याचा वापर जेव्हा महाराष्ट्राचे नाव मोठे करण्यासाठी केला जातो तेव्हा खूप आनंद होतो, असे नमूद करून त्यांनी दिव्याचे अभिनंदन केले. तिच्या कामगिरीपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अनेक महिला बुद्धिबळपटू तयार व्हाव्या, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.