- राज्य
- बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाशी बांधील असल्याचे स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी
बैलगाडा शर्यतीशी संबंधित सर्व मुद्द्यांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निकाल दिला असल्यामुळे त्यासंबंधी कोणत्याही नव्या आदेशाची गरज नसल्याचे सांगून मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण बांधील असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
शर्यतीदरम्यान बैलांना क्रूर वागणूक दिली जात असल्याचे आक्षेप घेऊन बैलगाडा शर्यतीला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ती प्रथमदर्शनीच फेटाळली आहे.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, कर्नाटकातील कांबळा, तामिळनाडूतील जल्लीकडू अशा सर्व प्रकारच्या शर्यतींच्या विरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने १८ मे २०२३ रोजी निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी शर्यतीच्या विरोधातील सर्व मुद्दे आणि शर्यतींना लागू असलेले नियम, कायदे यांचा सर्वंकष विचार करून निर्णय दिला आहे. त्या निर्णयाशी आपण बांधील असून त्यासंबंधी कोणतेही नवे आदेश जारी करता येणार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.