- राज्य
- 'जरांगे पाटील यांची पावले संघाच्या धोरणाप्रमाणेच'
'जरांगे पाटील यांची पावले संघाच्या धोरणाप्रमाणेच'
डॉ. संजय लाखे यांचे आरोप
जालना: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणानुसार मराठा समाजाला इतर समाजांपासून तोडण्याचे काम करीत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून आपले महत्त्व वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे गंभीर आरोप मराठा समन्वयक आणि आरक्षण अभ्यासक डॉ. संजय लाखे यांनी केले आहेत.
हैदराबाद गॅझेटियरच्या शासन आदेशाचा मसुदा जरांगे यांना आधीपासूनच माहिती होता. आंदोलनात तो वाचून मान्यता देण्याचे केवळ सोपस्कार करण्यात आले. वास्तविक आरक्षणाचा कायदा, कायदा आणि शासन आदेश यातील फरक अशा बाबतीत जरांगे यांचा अभ्यास बालवाडीच्या दर्जाचा आहे, अशी टीकाही डॉ. लाखे यांनी केली.
मराठा आरक्षणाबाबत घटनात्मक अभ्यास असलेल्या लोकांना जरांगे हे आपल्यापासून, आंदोलनातून दूर करत आहेत. वास्तविक मराठा आरक्षणाची चळवळ हा जगन्नाथाचा रथ आहे. मात्र, हा रथ आपण एकटेच ओढत असल्याची समजूत जरांगे यांनी करून घेतली आहे, असेही डॉ. लाखे म्हणाले.
केवळ जरांगे यांच्यावर फुले उधळण्यासाठी समाजाने १०० कोटीचा खर्च केला. प्रत्यक्षात जरांगे यांचे आंदोलन चुकीच्या मार्गाने जात असल्याने त्यामुळे समाजाच्या पदरात काहीही पडणार नाही. उलट नुकसानच होणार आहे. त्यांची एकही मागणी घटनात्मक, कायदेशीर आणि वैध नाही, असा दावा डॉ. लाखे यांनी केला.