- राज्य
- तपासयंत्रणांवरच न्यायालयाने उगारला कायद्याचा बडगा
तपासयंत्रणांवरच न्यायालयाने उगारला कायद्याचा बडगा
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तपासयंत्रणेबाबत न्यायालयाला शंका
मुंबई: प्रतिनिधी
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काही बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याच्या आरोपाची दखल घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणा विशेष न्यायालयाने याबाबत सखोल चौकशीचे आदेश जारी केले आहेत. एकूणच या प्रकरणात तपासयंत्रणाबाबत, विशेषतः दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासाबाबत न्यायालयाने संशय व्यक्त केला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल सतरा वर्षानंतर न्यायालयाने काल सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. केवळ संशयावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही. तपास यंत्रणांनी केवळ बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्ध केले. याप्रसंगी झालेले मृत्यू बॉम्बस्फोटामुळे झाल्याचे सिद्ध करता आले नाही. घटनास्थळी लावण्यात आलेल्या स्कूटरची मालकी कोणाची हे सिद्ध करता आले नाही. स्कूटरमध्ये आरडीएक्स स्फोटके ठेवण्यात आली होती हेही सिद्ध करता आले नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. त्यात आता तपास यंत्रणांवर खोटे पुरावे तयार केल्याचा संशय न्यायालयाने व्यक्त केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
आरोपीच्या घरात स्फोटके ठेवून खोटा पुरावा तयार केल्याचा संशय व्यक्त करून राष्ट्रीय तपास यंत्रणा विशेष न्यायालयाने दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी शेखर बागडे यांच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. एटीएस च्या अधिकाऱ्यांनी खोटे पुरावे उभे केल्याचा आरोप आरोपींपैकी काही जणांनी न्यायालयासमोर केला होता. न्यायालयाने त्याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.