- राज्य
- 'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज'
'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज'
रोहित पवार यांचा नवा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' असल्याचा नवा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. लाडक्या बहिणी आणि शेतकरी बांधव यांची घोर फसवणूक सरकारने केल्याचा त्यांचा आरोप आहे.
शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा या योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून सरकारने लाडकी बहीण योजनेला देखील भ्रष्टाचारातून वगळलेले नाही. या योजनेच्या निधीतून देखील मोठ्या रकमेचा अपहार सुरू आहे. सरकारने शासन निर्णय काढून लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यानंतर प्रसिद्धी आणि जाहिरातीची कामे ज्या संस्थांना द्यायचे आहेत त्यांची नावे देखील प्रसिद्ध केली .
त्याच संस्थांना माहिती व जनसंपर्क विभागाच्या द्वारे ही कामे देणे आवश्यक होते. मात्र, महिला व बालकल्याण विभागाने वेगळ्या तीन कोटी रुपयांची तरतूद करून वेगळ्याच संस्थांना हे काम देण्यात आले. प्रसिद्धीची कामे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देण्यात येत असताना महिला व बालकल्याण विभागाने परस्पर ही कामे का दिली, याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण महिला व बालकल्याण विभाग का देत नाही, ही कामे बोगस कंपन्यांना दिली गेली का, असे सवाल रोहित पवार यांनी समाज माध्यमातून केले आहेत.