- राज्य
- 'मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनांचे पालन करणार'
'मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनांचे पालन करणार'
आमदार गोपीचंद पडळकर यांचा निर्वाळा
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर कठोर शब्दात टीका केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानउघाडणी केली आहे. याबद्दल स्वतः पडळकर यांनीच पत्रकारांना माहिती दिली. या पुढील काळात मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात जत येथे बोलताना पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबरोबरच त्यांचे पिता राजारामबापू पाटील यांच्यावर देखील टीका केली होती. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात तीव्रपणे उमटत आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी फडणवीस यांना दूरध्वनी करून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर फडणवीस यांनी पडळकर यांना ताकीद दिली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी केलेले विधान अयोग्य आहे. कोणाच्याही वडिलांबाबत अथवा कुटुंबीयांच्या बाबतीत टीका करणे योग्य नाही. याबाबत आपण पडळकर यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारांचे समर्थन कधीही केले जाणार नाही, याची खात्री आपण पवार यांना दिली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.