- राज्य
- हिंदुत्ववादी महायुतीत अजित पवार काढणार मुस्लिम कार्ड
हिंदुत्ववादी महायुतीत अजित पवार काढणार मुस्लिम कार्ड
आपल्या वाट्याच्या जागांपैकी दहा टक्के मुस्लिम उमेदवारांना मिळणार
बारामती: प्रतिनिधी
महायुतीचे मूळ घटक पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष असले तरीही नंतर महायुतीत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम कार्ड काढणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणाऱ्या जागांपैकी दहा टक्के जागांवर मुस्लिम उमेदवारांना रिंगणात उतरवले जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजप आणि शिवसेनेला मुस्लिम मतदारांकडून मतांची फारशी अपेक्षा नसली तरीही अजित पवार गटात मुस्लिम नेत्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या, मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनाही मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केले. त्याचा परिणाम अजित पवार यांच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मुस्लिम मतांवरही झाल्याशिवाय राहिला नाही.
मुस्लिम समाजाची मते सर्वच पक्षांना हवी असतात. मात्र, मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यास कोणत्याच पक्षाला रस नसतो, अशा भावना अनेक मुस्लिम नेत्यांनी अनेकदा व्यक्त केल्या आहेत. राजकीय पक्षांकडून अपेक्षाभंग झाल्याचा परिणाम मुस्लिम समाजाने तर खुद्द ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावरच निदर्शनेही केली होती. ही नाराजी मतात रूपांतरित करून आपल्याकडे वळवण्याचा हा अधिक पवारांचा प्रयत्न आहे.
भाजप आणि शिवसेनेला मुस्लिम मतांची अपेक्षा ठेवणे शक्य नसले तरीही अजित पवार यांची आपले मुस्लिम मतदार गमावण्याची तयारी नाही. त्यामुळेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम कार्ड खेळण्याचे ठरविले असावे. लोकसभेत बसलेला फटका भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उचललेल्या या पावलाचे भाजप आणि शिवसेनेने देखील अप्रत्यक्षपणे का होईना, स्वागतच केले असण्याची शक्यता आहे.