- राज्य
- चाकण आणि परिसरात होणार नवी महापालिका
चाकण आणि परिसरात होणार नवी महापालिका
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केलेल्या पाहणीच्या वेळी अजित पवार यांचे संकेत
पुणे: प्रतिनिधी
चाकण शहर आणि एमआयडीसी परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण शहर आणि परिसराची पाहणी केली. यावेळी चाकण आणि परिसराची नवी महापालिका स्थापन करण्याचे संकेत त्यांनी दिले.
सकाळी पावणेसहा वाजताच अजित पवार हे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसह चाकण येथे वाहतूक कोंडीच्या पाहणीसाठी उपस्थित झाले. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याच्या दृष्टीने त्यांनी थेट नागरिकांमध्ये जाऊन चर्चा केली. आतापर्यंत चाकणवासीयानी खूप त्रास सहन केला. आता यातून मार्ग काढू, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
पुणे नाशिक उन्नत महामार्गाची उभारणी केली जाईल. तळेगाव ते शिक्रापूर हा रस्ता सहा पदरी केला जाईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले. याचवेळी, कोणाला आवडो किंवा न आवडो पण चाकण आणि परिसरात महापालिका स्थापन करण्याशिवाय अन्य मार्ग राहिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.