- राज्य
- मुंबई उच्च न्यायालयाने केली सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी
मुंबई उच्च न्यायालयाने केली सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी
योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास अडथळे
मुंबई: प्रतिनिधी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणण्याचा आग्रह धरून अडथळे आणू नका, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी केली आहे.
'अजेय - दि अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन या, अशी अट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांना घातली.
ही अट अनावश्यक असल्याचा दावा करून चित्रपट निर्मात्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. चित्रपट न बघताच प्रमाणपत्र संबंधी निर्णय कसा घेतला, असा सवाल न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला केला आहे. चित्रपट पहा. त्यात आक्षेपार्ह काय आहे, हे चित्रपट निर्मात्यांना सांगा आणि हा चित्रपट संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर असल्यामुळे योगी आदित्यनाथ यांना देखील चित्रपटातून काढून टाकण्यात येणारी दृश्य आणि संवाद याची माहिती द्या. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणण्याचा आग्रह चित्रपट निर्मात्याकडे धरू नका, असे आदेश न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत.