- राज्य
- 'मुंडे यांच्या जागी भुजबळ मंत्री झाले तर...'
'मुंडे यांच्या जागी भुजबळ मंत्री झाले तर...'
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र सदनात घोटाळा करणारे छगन भुजबळ मंत्री होणार असतील तर एक घाण जाऊन दुसरी घाण येणार आहे. असे होऊ नये यासाठी आपण न्यायालयात जाऊन भुजबळ यांचा जामीन रद्द करण्याची विनंती करणार आहोत, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने महायुती विजयी झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर दीर्घकाळ त्यांचे नाराजीनाट्यही रंगले. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळातील रिक्त झालेल्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लावली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिलेच्या मानसिक छळ आणि विनयभंगाचा आरोप होत असलेले मंत्री जयकुमार गोरे यांची देखील मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. असे विकृत मंत्री मंत्रिमंडळात ठेवता कशाला, असा सवाल त्यांनी केला. गोरे यांची हकालपट्टी व्हावी या मागणीसाठी पीडित महिलेसह आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विकृत आणि भ्रष्ट मंडळी मंत्रिमंडळात बसली असतील तर त्यांना दूर करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे लोक मंत्रिमंडळात येतातच कसे? कुठून शोधून शोधून असे नग भरले आहेत? महाराष्ट्रात मंत्री होण्यात चागली माणसे मिळत नाहीत का, असे बोचरे सवालही दमानिया यांनी केले.