- राज्य
- '... तर राज्यात आणावी लागेल राष्ट्रपती राजवट''
'... तर राज्यात आणावी लागेल राष्ट्रपती राजवट''
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती
मुंबई: प्रतिनिधी
गुरुवारी विधान भवनात गॅंगवॉर घडले. या प्रकारात विधिमंडळाच्या आवारात गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेले सराई गुन्हेगार सर्रास वावरत होते. ही परिस्थिती कायम राहिली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणावी लागेल, अशी भीती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
गुरुवारी विधिमंडळाच्या लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही पक्षाच्या संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आपल्या सहकाऱ्यांकडून पोलिसांच्या गाडीची मोडतोड करण्याचा गुन्हा घडला आहे. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा, असे पडळकर यांनी नमूद केले आहे. मात्र, अशावेळी कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी आपण पुढे का आला नाहीत, या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले.

आपल्या कार्यकर्त्यांच्या बचावासाठी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघे पहाटे तीन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनेही केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या मारामारीच्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. राजकारण गुंडांच्या हाती गेल्यानंतर काय घडते, हे आपल्याला या घटनेतून दिसून आले आहे, असे त्यांनी समाज माध्यमांवर नमूद केले आहे.