- राज्य
- लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन होणार पडताळणी
लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन होणार पडताळणी
योजनेतील गैरप्रकारांमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकारांचे शेपूट वाढत चालले असल्यामुळे केवळ अर्ज पडताळणीवर न थांबता घरोघरी जाऊन या योजनेच्या लाभार्थींची तपासणी व चौकशी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी अनेक गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. त्यातच आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिलांनी कागदोपत्री क्लृप्ती लढवून निधी मिळवल्याचे उघड झाले आहे. विशेषतः जालना जिल्ह्यात अशा प्रकरणांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
यापूर्वी अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे शासकीय नोकरीत असलेल्या महिलांनी देखील या योजनेतून निधी प्राप्त केला आहे. सर्वात कहर म्हणजे केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेतून 14 हजार पुरुषांनी देखील पैसे लाटले आहेत. त्यामुळे सरकारने माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत या योजनेसाठी आलेल्या अर्जांची फेरपडताळणी सुरू केली आहे. मात्र, केवळ अर्जांच्या तांत्रिक तपासणीवर न थांबता घरोघरी जाऊन खातरजमा करून घेण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अमलात आणली. या योजनेचा महायुतीला निवडणुकीत उल्लेखनीय फायदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही योजना व्यवहार्य नसल्याने निवडणुकीनंतर ती बंद करण्यात येईल, असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. मात्र, सरकारने नेटाने ही योजना सुरू ठेवली आहे. अर्थात, या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे सरकार फेर पडताळणीच्या मार्फत लाभार्थींची संख्या मर्यादित करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आक्षेपही घेतला जात आहे.