- राज्य
- 'अपात्र 'लाडक्या बहिणी'कडून करणार पुरेपूर वसुली'
'अपात्र 'लाडक्या बहिणी'कडून करणार पुरेपूर वसुली'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी
सरकारी कर्मचारी असून अथवा इतर योजनांचा लाभ घेत असूनही लाडकी बहीण योजनेत लाभ मिळवणाऱ्या अपात्र 'लाडक्या बहिणी'कडून त्यांनी गैरमार्गाने मिळवलेल्या निधीची पुरेपूर वसुली केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे पुरुषांनी या योजनेद्वारे निधी लाटण्याचे प्रकार गंभीर असून त्यावर योग्य कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील 26 लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. त्याचप्रमाणे केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ 14 हजार पुरुषांनी देखील घेतला आहे, असे आरोप केले जात आहेत. नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.
या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जाची फेर तपासणी केली जात असल्याबद्दल माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.
सर्व 26 लाख महिला अपात्र नाहीत
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या अर्जांची फेर तपासणी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून केली जात आहे. आतापर्यंत अशा 26 लाख अर्जांची फेर तपासणी करण्यात आली असून त्यापैकी सर्व 26 लाख महिला अपात्र ठरलेल्या नाहीत, हे आदिती तटकरे यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. मात्र या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.