- राज्य
- लोकमान्य टिळक यांचे पणतू दीपक टिळक यांचे निधन
लोकमान्य टिळक यांचे पणतू दीपक टिळक यांचे निधन
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
पुणे प्रतिनिधी
थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांचे पणतू व दै. केसरीचे संपादक डॉ. दीपक टिळक यांचे त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या मागे काँग्रेस नेते रोहित टिळक, कन्या नातवंडे असा परिवार आहे. दुपारी अकरा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव केसरी वाड्यात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
डॉ टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती होते. त्याचप्रमाणे टिळक स्मारक ट्रस्ट, वक्तृत्व उत्तेजक सभा या संस्थेचे अध्यक्ष होते. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. वकृत्व उत्तेजक सभेच्या वतीने राज्यभरात विख्यात असलेल्या रानडे वाद स्पर्धेचे तसेच वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.
जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ टिळक यांनी मोठे कार्य केले. या कार्याची दखल घेऊन जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने सन 2021 मध्ये विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. क्रीडा क्षेत्रातही डॉ टिळक यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ज्युदो या क्रीडा प्रकाराला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून दुःख व्यक्त केले जात आहे.