'देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या जनाधाराची राखावी बूज'
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा इशारा
पुणे: प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासमोर सर्व संदर्भासह वृत्तपत्रे व अन्य माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाचा कोणताही संवैधानिक अधिकार पोहोचत नसतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते विसंगत विधाने व आरोप करण्याची माकडचेष्टा का करत आहेत, असा संतप्त सवाल काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
वास्तविक निवडणूक आयोगाच्या कार्य व कर्तव्यपूर्तीवर प्रश्न विचारले असतांना अचानक वावटळ उठल्याप्रमाणेच निवडणूक आयोगाला पाठीशी घालण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्नच संशयावर शिक्कामोर्तब करणारे असून भाजप नेत्यांचे हे प्रकार असंवैधानिक व निंदनीय असल्याचे प्रतिपादन तिवारी यांनी केले.
आपल्या प्रसिद्धी निवेदनात ते पुढे म्हणतात की, २०१९ च्या तुलनेत २०२४ निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब करून काँग्रेसला ५२ वरून १०२ जागा बहाल केल्या व देशास सक्षम विरोधी पक्ष नेता देण्यासाठी जनतेने काँग्रेसला अधिक मजबूत केले.
याच जबाबदारीच्या जाणीवेतून लोकशाहीच्या जपणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात गंभीर मुद्दे सर्वप्रथम संसदेत उपस्थित केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सोबत पत्रकार परिषदेतही ते उपस्थित केले. काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारी केल्या. राज्यातील प्रमुख नेते, विरोधी पक्ष नेते, प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत देखील वेळोवेळी उपस्थित केले.
राज्यातील जाहीर नोंदणीकृत मतदारसंख्येपेक्षा झालेले मतदान जास्त कसे, या व अशा अनेक गंभीर मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. तसेच अनेक काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांनी न्यायालयात देखील दाद मागितली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कुठेही सत्य व वास्तवाला दाद दिली जात नाही हे पाहून राहुल गांधी यांनी प्रसिद्धीमाध्यमातून हा प्रकार जनतेसमोर आणण्याचा कर्तव्य पार पाडले आहे.
मात्र, राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखात कुठेही सत्तापक्षाला विचारणा केली नसतांना मात्र विनाकारण निवडणूक आयोगाऐवजी लक्ष भरकटवण्याचे निंदनीय प्रकार भाजप नेते करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
000