'निष्ठावंतांचा पक्षत्याग ही चिंतेची बाब'

अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केली मानसिकता बदलण्याची गरज

'निष्ठावंतांचा पक्षत्याग ही चिंतेची बाब'

पुणे: प्रतिनिधी 

पुरंदरचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा काँग्रेसचे दीर्घकाळ अध्यक्ष असलेले संजय जगताप यांनी भारतीय जनता पक्षात केलेला प्रवेश हा जिल्ह्याचे राजकारण बदलविणारा आहे. निष्ठावंत नेते, कार्यकर्त्यांचे पक्षत्याग ही चिंतेची बाब असून राजकारणात टिकून राहण्यासाठी विचारसरणीला सोडण्याची मानसिकता बदलण्याची गरज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केली. 

संजय जगताप यांचे घराणे पुरंदर तालुक्यातील प्रभावशाली राजकीय घराणे असून ते दीर्घकाळ काँग्रेस विचाराचे अनुयायी राहिले आहेत. संजय जगताप यांची सन 2016 मध्ये काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी केवळ दोन दिवस त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तब्बल नऊ वर्ष पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी असलेल्या जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे मोठे नुकसान होणार असल्याची भावना पक्षात आहे. 

पुणे शहरातील विशिष्ट पेठा वगळता पुणे शहर आणि जिल्हा हा काँग्रेस विचारांचा पाठीराखा राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर या पक्षाची प्रभाव जिल्ह्यात वाढत गेला. मात्र, मागील काही काळापासून काँग्रेस विचाराच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा भाजपच प्रयत्न आहे. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये असलेले आणि नंतरच्या काळात अपक्ष आमदारांचे नेतृत्व करणारे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांना भाजपने सामील करून घेतले. त्यानंतर पक्षात राजकीय भवितव्य उरले नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी भाजपला रामराम ठोकला.

हे पण वाचा  संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्याला संधी: शरद पवार

काही महिन्यापूर्वीच भोर तालुक्यात राजकीय प्रवाह असलेल्या संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुरंदर आणि भोर तालुक्यात प्रभावशाली घराण्यातील काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांना याच दोन्ही तालुक्यातून लक्षणीय मताधिक्य मिळाले होते. थोपटे आणि काही जगताप घराण्यांच्या माध्यमातून भाजप जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. 

जगताप घराण्याचा दीर्घकाळ काँग्रेसच्या विचारसरणीवर ठाम विश्वास राहिला आहे. मात्र, मागील काही वर्षात परिस्थिती बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष सर्वसमावेशक प्रगती करीत आहे. त्यामुळे आपण भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा जगताप यांचा दावा आहे. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt