- राज्य
- 'कोकाटे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही'
'कोकाटे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही'
शशिकांत शिंदे यांचा सरकारला इशारा
मुंबई: प्रतिनिधी
सभागृहात रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मदत व पुनर्वसन खाते देऊन पुनर्वसन केले जाणार असल्याचे समजते आहे. मात्र, आम्ही कोकाटे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
कोकाटे कायम वादग्रस्त राहिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना यावेळी पहिल्यांदाच बोल लावले नाहीत. यापूर्वी अनेकदा त्यांची कान उघाडणी करण्यात आली आहे. मात्र, ते कोणाचे ऐकत नाहीत, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री राजीनामे देत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री राजीनामे देत नाहीत. सरकार चालवायचे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल आहेत. त्यामुळे ते कोणाचेच राजीनामे घेऊ शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
मंत्रिमंडळातील ही अवस्था अत्यंत विदारक आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा चुकीचा संदेश बेजबाबदार विधाने आणि वर्तन करणाऱ्या मंत्र्यांमध्ये जात आहे. मात्र, आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला.