इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना, हे सरकारने घेतलेले बळी : हर्षवर्धन सपकाळ
दुर्घटना झाल्यावरच भाजपा युती सरकारला जाग, धोकादायक पुल खुला का ठेवला?
पिंपरी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
इंद्रायणी पुल दुर्घटनेवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कुंडमळा येथील लोखंडी पुल कमकुवत झाला होता, त्याच्यासाठी वर्षभरापूर्वी निधीही मंजूर केल्याचे सरकार सांगत आहे. मग वर्षभर काम का झाले नाही? सरकार दुर्घटना होण्याची वाट पहात बसले होते का? त्या पुलावर ‘पाटी’ लावली होती असे प्रशासन सांगत आहे पण अशा पाट्या लावून ‘पाट्या’ टाकण्याचेच काम शासन व प्रशासन करत आहे. ५५ पर्यटक वाहून गेले, त्यातील अनेकांना वाचवण्यात आले, पण चार जण ठार झाले तर सहा गंभीर जखमी झाले, याला जबाबदार कोण? मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये दिले म्हणजे सरकारची जबबादारी संपत नाही. जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणीही गांभिर्याने घेणार नाही व अशा दुर्घटना होऊन निष्पाप लोक मात्र मरत राहतील.
पुल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकार म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा आहे. दुर्घटना होतात, लोक मरतात आणि सरकार काही पैसे तोंडावर फेकून ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखे पुन्हा तेच होत रहाते, हे दुष्टचक्र थांबले पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले..
000