- राज्य
- 'रोहिणी खडसे रूपाली चाकणकर वादातून महिला आयोग सक्रिय?'
'रोहिणी खडसे रूपाली चाकणकर वादातून महिला आयोग सक्रिय?'
प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरणी रूपाली पाटील यांनी केला सवाल
पुणे: प्रतिनिधी
प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टीप्रकरणी राज्य महिला आयोगाने घेतलेला पुढाकार आणि रूपाली चाकणकर यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही रोहिणी खडसे आणि रूपाली चाकणकर यांच्यातील वादाची परिणीती आहे काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खेवलकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. खेवलकर यांनी अनेकदा मुलींना बोलावून पार्टी केली आहे. चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार केले गेले. खेवलकर यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये पोलिसांना अश्लील चित्र सापडले. त्यापैकी काहीच मध्ये स्वतः खेवलकर दिसत आहेत, असे आरोप चाकणकर यांनी केले.
मात्र, चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काहीच नवीन नव्हते. या सर्व गोष्टी पोलिसांनी यापूर्वीच न्यायालयासमोर मांडल्या आहेत. महिला आयोग ही तपास यंत्रणा नव्हे. असे प्रकार घडले असतील तर पीडितांनी पुढे येऊन तक्रारी कराव्या. त्याचप्रमाणे असे प्रकार घडले असतील तर ते संमतीने घडले की जबरदस्तीने हे देखील पहावे लागेल, असेही रूपाली पाटील म्हणाल्या.
राज्य महिला आयोगाचे काम पीडितांचे समुपदेशन करणे, शासकीय योजनांचे लाभ महिलांपर्यंत पोहोचविणे, महिला अत्याचाराची घटना घडली असेल तर घटनास्थळाला भेट देणे, या स्वरूपाचे आहे, असेही रूपाली पाटील यांनी रूपाली चाकणकर यांना उद्देशून सुनावले आहे.