डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
26 जूनपर्यंत मुदतवाढ
आतापर्यंत पाच हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल - प्राचार्य डॉ. सुरेश पाटील
कराड : महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत १० वी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील १२ तंत्रनिकेतन संस्थांमध्ये एकूण ३२७० जागांसाठी आतापर्यंत तब्बल ४ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २६ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन, कराड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. रजनिश पिसे, प्रा. प्रियांका कांबळे, प्रा. दिपाली निकम, प्रा. स्वाती जाधव, डॉ. राम शिंदे, डॉ. चंद्रकांत सिमीकेरी, प्रा. मनिष भट यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले, कराड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि मॅकॅट्रॉनिक्स अशा विविध शाखांमध्ये पदविका अभ्यासक्रम राबवले जात आहेत. नवीन अभ्यासक्रम प्रणालीमुळे अल्प कालावधीत, माफक शुल्कामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येते. याचबरोबर, विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम रोजगाराच्या संधीही मिळत आहेत. गेल्या वर्षी कराडमधील शासकीय तंत्रनिकेतनमधील १७१ विद्यार्थ्यांना थेट कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरीची संधी मिळाली, तर यातील दोन विद्यार्थ्यांचे वार्षिक वेतन साडेआठ लाख रुपये होते. विशेष म्हणजे, काही कंपन्या विद्यार्थ्यांना नोकरी करतानाच पदवी शिक्षण पूर्ण करण्याचीही संधी देत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतानाच, शिक्षणातही पुढे जाऊ शकतात.
प्रा. रजनिश पिसे म्हणाले, "तंत्रनिकेतन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढली असून, प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. याशिवाय, डिप्लोमासाठी लागणारे विविध शासकीय दाखले मिळवण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागू नये, यासाठी कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी शाळास्तरावरच हे दाखले उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली आहे. हा उपक्रम इतर तालुक्यांनी राबविल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही प्रा. पिसे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत प्रा. दिपाली कांबळे यांनी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. प्रा. प्रियांका कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. स्वाती जाधव यांनी आभार मानले.
“सातारा जिल्ह्यातील १२ तंत्रनिकेतन संस्थांमध्ये ३२७० प्रवेश क्षमतेसाठी आतापर्यंत जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला आहे. यावरून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. २६ जून २०२५ पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.” - प्राचार्य डॉ. सुरेश पाटील
000000000000000