- राज्य
- '... तर मी स्वतः पोलिसांना शरण जाऊन करवून घेतो अटक'
'... तर मी स्वतः पोलिसांना शरण जाऊन करवून घेतो अटक'
एकनाथ खडसे यांच्या आरोपावर गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर
जळगाव: प्रतिनिधी
जामनेर येथे झुंडाबळी ठरलेल्या युवकाच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी, खडसे ज्यांचे नाव येथील त्यांना अटक करू. त्यांच्या मनात असेल तर मी स्वतः देखील पोलिसांसमोर हजर होऊन स्वतःला अटक करवून घेतो, असा उपरोधिक टोला लगावला.
सुलेमान रहीम खान पठाण हा २१ वर्षांचा युवक. आपल्या मैत्रिणीबरोबर एका कॅफेत बसलेला असताना दहा ते बारा जणांच्या जमावाने त्याला बाहेर काढून जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू असून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी योग्य तपास होत नसल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील अनेक शहरांमध्ये मांसविक्रीला बंदी असताना घरात मांसाहारी जेवणाचे आयोजन करून सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्याची एमआयएम नेते इम्तियाज जलील यांची कृती अयोग्य असल्याचे मतही महाजन यांनी व्यक्त केले.
हे सल्ले आपल्या घरच्यांना द्या
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे रेव्ह पार्टीच्या प्रकरणात अटकेत आहेत. त्यावरून सतत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्याचा विकासाबद्दल नेत्यांनी चर्चा करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर महाजन यांनी त्यांना, हे सल्ले आपल्या घरच्यांना द्या, अशा शब्दात घरचा आहेर दिला आहे.