- राज्य
- 'मतांच्या राजकारणासाठी मविआकडून राज्याची कोंडी'
'मतांच्या राजकारणासाठी मविआकडून राज्याची कोंडी'
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची विरोधकांवर टीका
मुंबई: प्रतिनिधी
फोडा आणि राज्य करा, या इंग्रजांच्या कूटनीतीचा वापर करून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा प्रयत्न असून सरकारला कोंडीत पकडून त्यांच्या हातून निसटलेले मत आणि गेलेली पत परत मिळविण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र, या कुटिल कारस्थानात केवळ सरकारच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला जात आहे याचे भान त्यांना राहिलेले नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाजमाध्यमांमध्ये एका प्रदीर्घ पोस्टद्वारे केली आहे.
आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या या पोस्टमध्ये उपाध्ये म्हणतात की, लोकशाहीमध्ये आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा हक्क सर्वांना असला तरी देखील सरकारला इतर घटकांचे आरक्षण हिरावून ते विशिष्ट घटकाला देणे हे शक्य नाही. ते सामाजिक वीण उसवणारे ठरणार आहे. घटनेच्या चौकटीत राहून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासंबंधी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यापूर्वी महायुती सरकारने मराठा समाजाला इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता दहा टक्क्यांचे आरक्षण दिले आहे. ते न्यायालयात टिकले देखील आहे. त्या तरतुदीनुसार शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीत भरती सुरू आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला अडचणीत आणावे, दोन समाजांमध्ये झुंज लावावी आणि मतांचे लोणी आपल्या पदरात पाडून घ्यावे, असा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.
शरद पवार यांचा दुटप्पीपणा
एकीकडे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विदर्भात मंडळ यात्रा आयोजित करतो आणि मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये, अशी मागणी करतो. दुसरीकडे याच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या, मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनातही सहभाग नोंदवतात. हा दुटप्पीपणा आहे, असा आरोपह उपाध्ये यांनी केला.
सामाजिक वीण उसवण्याचे खापर...
आपण सत्तेवर असताना मराठा मूक मोर्चाची मुका मोर्चा, अशा शब्दात अवहेलना करणारे आणि आपल्या कार्यकाळातील ढिसाळ कारभारामुळे उच्च न्यायालयात टिकलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात घालवून बसणारे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आता मराठ्यांची कड घेत आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाबाबत कळवळा दाखवणारे हे विरोधी पक्ष, सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीबद्दल कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत, असा आक्षेप उपाध्ये यांनी नोंदवला. विरोधकांच्या या कटकरास्थानांमुळे समाजातील वीण उसवली गेल्यास त्याचे खापर महाविकास आघाडीच्या माथी फुटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उपाध्ये यांनी दिला.