- राज्य
- ... आणि ही बोलकी बाहुली पडतील तोंडावर
... आणि ही बोलकी बाहुली पडतील तोंडावर
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची राऊत यांच्यावर टीका
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे केवळ धन्याचे मिंधे असलेले बोलके बाहुले आहेत. या देशातही हिंसाचार आणि अराजक उसळावा अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, या देशातील देशाभिमानी जनता हे घडू देणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
नेपाळमध्ये सध्या युवा पिढीकडून हिंसक आंदोलन सुरू आहे. समाज माध्यमांवर घातलेल्या बंदीमुळे हे आंदोलन पेटले आहे. आंदोलक विविध नेत्यांवर हिंसक हल्ले करीत आहेत.
अशा हल्ल्यांपैकी नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना आंदोलकांकडून मारहाण होत असल्याची चित्रफीत संजय राऊत यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. त्यावर, 'हे कोणत्याही देशात घडू शकते,'असा इशारा देणारी टिप्पणी ही जोडली आहे. यावर उपाध्ये यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मालदीव, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि आता नेपाळमध्ये हिंसा आणि अराजकता घडवून आणणाऱ्या शक्तींची भारतातील पिल्लावळ भारतात देखील हेच घडून यावे, या प्रयत्नात आहे. लोकशाही संस्थांच्या विरोधात असंतोष निर्माण करून भारतात अराजक निर्माण व्हावे यासाठी राऊत यांचे धनी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देव पाण्यात घालून बसले आहेत.
मात्र, या देशातील जनता देशाभिमानी, धर्माभिमानी आहे. या देशाच्या सैन्यशक्तीमुळे शत्रूंचा थरकाप उडतो. देशात हिंसा घडवण्याचे आणि अराजक निर्माण करण्याचे या माओवादी पिल्लावळीचे स्वप्न या देशाची जनता आणि सैन्य कधीही पूर्ण करणार नाही आणि ही बोलकी बाहुली तोंडावर पडतील, अशी ग्वाही देखील उपाध्ये यांनी दिली.