- राज्य
- सी पी राधाकृष्णन हे बहुआयामी नेतृत्व: एकनाथ शिंदे
सी पी राधाकृष्णन हे बहुआयामी नेतृत्व: एकनाथ शिंदे
उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन
नवी दिल्ली: प्रतिनिधी
सी पी राधाकृष्णन हे दीर्घकाळ उच्च पदावर राहून देखील साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि मनमिळाऊ स्वभाव असलेले बहुआयामी नेतृत्व आहे. आज ते उपराष्ट्रपती पदावर विराजमान झाले आहेत. मोठ्या बहुमताने त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हा आनंदाचा दिवस आहे, असे सांगतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या शपथग्रहण समारंभाच्या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलत होते. राधाकृष्णन यांना संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीत त्यांच्या अनुभवाचा देशाच्या विकासासाठी उपयोग होईल, असेही ते म्हणाले.
... म्हणून अजितदादा अनुपस्थित
या समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. त्याबद्दलचे स्पष्टीकरणही शिंदे यांनी दिले. रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची माझी भेट झाली, असे शिंदे यांनी सांगितले.
तो शासन निर्णय कायदेशीरच
हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याबाबत जारी करण्यात आलेला शासन निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप होत आहे. त्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात काही जनहित याचिकाही दाखल झाल्या आहेत. मात्र, हा शासन निर्णय पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून काढण्यात आला असल्याचा दावा शिंदे यांनी केला.
राऊत यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया
नेपाळच्या अर्थमंत्र्यांना मारहाण होत असल्याची चित्रफीत समाज माध्यमांवर जाहीर करून त्यावर, असे कुठेही घडू शकते, अशी टिप्पणी राऊत यांनी केली होती. त्यांच्या या विधानावर शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकारची वक्तव्य कोणताही देशाभिमानी नागरिक करू शकत नाही. ही वक्तव्य दुर्दैवी आहेत. आपल्याकडे देखील नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण व्हावी, अशी कुणाची सुक्त इच्छा आहे काय, अशी शंका अशा वक्तव्यांमुळे निर्माण होते. आपल्याच देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
... तर शिवभक्त देतील जशास तसे उत्तकर
कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो टर्मिनसचे नाव बदलून सेंट मेरी हे नाव देण्याचा प्रस्ताव दुर्दैवी असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. हा प्रस्ताव पुढे भटल्यास शिवभक्त जशास तसे उत्तर देतील, असा इशारा त्यांनी दिला. शिवछत्रपती हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहेत. इंग्रज भारतातून निघून गेले त्याला अनेक वर्ष टली आहेत. आता त्यांच्या आठवणी काढण्याचे कोणतेही कारण नाही, असेही शिंदे म्हणाले.