- देश-विदेश
- बिलावल यांचे शिष्टमंडळ अमेरिकेसह युनोमध्ये तोंडघशी
बिलावल यांचे शिष्टमंडळ अमेरिकेसह युनोमध्ये तोंडघशी
दहशतवादाला पाठिंबा दिल्याबद्दल ऐकावे लागले खडे बोल
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर भारताप्रमाणेच पाकिस्तानने देखील आपली भूमिका मांडण्यासाठी माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ विदेशात रवाना केले. मात्र, बिलावल यांनी मोठ्या मोठ्या बाता मारून देखील त्यांना अमेरिकेत आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत तोंडघशी पडावे लागले. दहशतवादाला पाठीशी घालणे थांबवावे, असे सागत त्यांना खडे बोल सुनावण्यात आले. विशेष म्हणजे शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ चमकदार कामगिरी करत असतानाच बिलावल यांना मान खाली घालण्याची वेळ आली.
बिलावल भुट्टो यांनी अमेरिकेत जाऊन नेहमीप्रमाणेच पाकिस्तान दहशतवादाला पोसत नसून उलट दहशतवादाचा बळी आहे, हे रडगाणे गायले. त्याचवेळी आमची गुप्तहेर संघटना आयएसआय ही दहशतवादाशी लढण्यास सक्षम असून आयएसआय आणि भारताची रॉ गुप्तचर यंत्रणा यांनी एकत्र काम केल्यास दोन्ही देश दहशतवादमुक्त होतील, अशी मुक्ताफळे उधळली. पाकिस्तानची भारताशी सर्व मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र, भारताकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. उलट सिंधू करार स्थगित करून पाकिस्तानचे पाणी तोडण्यासारखी कृत्य केली जात आहेत, असे बिलावल भुट्टो यांनी अमेरिकेत आणि सुरक्षा परिषदेत सांगितले.
मात्र, अमेरिकेतील जेष्ठ खासदार ब्रॅड शेरमन यांनी बिलावल यांचे कान उपटले. आधी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा. पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समाजाच्या सुरक्षेची व्यवस्था करा, असे त्यांनी सुनावले. माझ्या मतदारसंघात राहणारे वॉल स्ट्रीट जर्नल पत्रकार डॅनियल पर्ल यांची हत्या करणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कायमचा बीमोड करा. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यासाठी मदत करणारे डॉ. शकील आफ्रिदी यांची तुरुंगातून सुटका करा, असे पर्ल यांनी बिलावल यांना सांगितले. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत देखील त्यांना दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे, असेच सांगण्यात आले. अर्थातच बिलावल यांची अमेरिका वारी पूर्णपणे निष्फळ ठरली.