- राज्य
- खराडी परिसरासह शहरातील खाजगी पार्ट्या पोलिसांच्या रडावर
खराडी परिसरासह शहरातील खाजगी पार्ट्या पोलिसांच्या रडावर
हॉटेल आणि सर्विस अपार्टमेंट चालकांना देण्यात आली तंबी
पुणे: प्रतिनिधी
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना खाजगी पार्टीत अटक झाल्यानंतर पुणे पोलिसांनी उच्चभ्रू समजला जाणारा खराडी परिसर आणि एकूणच शहरातील खाजगी पार्ट्यांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने शहरातील हॉटेल आणि सर्विस अपार्टमेंट चालकांना पोलिसांकडून तंबी देण्यात आली आहे.
खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना खाजगी पार्टीत छापा घालून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मद्य हुक्का आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
या प्रकरणामुळे खराडी परिसरात होणाऱ्या खासगी पार्ट्या पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. हॉटेल आणि सर्विस अपार्टमेंटमध्ये ओळख लपवून बुकिंग करणे, वारंवार येणारी जोडपी, खाजगी पार्ट्यांमध्ये होणारे अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री आणि देहविक्री याला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यादृष्टीने आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची ओळखपत्रासह योग्य प्रकारे नोंदणी, त्या ठिकाणी होणाऱ्या आक्षेपार्ह प्रकारांबद्दल माहिती देणे याबाबतच्या सूचना पोलिसांनी हॉटेल व्यवसायिक आणि सर्विस अपार्टमेंट भाड्याने देणाऱ्या लोकांना दिले आहेत.