- राज्य
- पार्थ पवार यांनी घेतली संजोग वाघेरे यांची भेट
पार्थ पवार यांनी घेतली संजोग वाघेरे यांची भेट
वाघेरे पुन्हा स्वगृही परतण्याची चर्चा राजकीय वर्तुळात
पुणे: प्रतिनिधी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे संजोग वाघेरे पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात परत येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पार्थ पवार मागील काही काळापासून पिंपरी चिंचवडच्या राजकारणात रस घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली. त्याच भेटीदरम्यान त्यांनी संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि तिथे भोजनही केले. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
वाघेरे हे पिंपरी चिंचवड शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली. पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांचा मोठा प्रभाव आहे. लक्ष्मण जगताप यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट भारतीय जनता पक्षात जाईपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेत आणि त्या ठिकाणी उद्योगधंदे आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा मोठा वाटा आहे तर पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे संजोग वाघेरे स्वगृही परतल्यास तो ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे.