- राज्य
- 'महापालिकेत भ्रष्टाचाराची हंडी फुटून विकासाची हंडी येणार'
'महापालिकेत भ्रष्टाचाराची हंडी फुटून विकासाची हंडी येणार'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान
मुंबई: प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीत परिवर्तन अटळ असून भ्रष्टाचाराची हंडी फुटणार आणि विकासाची हंडी लागणार. त्या हंडीतील लोणी जनतेला देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वरळीच्या जंबोरी मैदानातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या परिवर्तन दहीहंडी उत्सवाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
इतकी वर्षे महापालिकेच्या दहीहंडीतील लोणी कुठे जात होते ते सर्वांनाच माहिती आहे. या निवडणुकीत महापालिका निवडणुकीत परिवर्तन होणे निश्चित आहे. त्यानंतर आम्ही मुंबईकरांना महापालिकेच्या माध्यमातून सर्व चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे सण, उत्सव ही राजकारण्यांना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पर्वणी असते. त्यामुळ अनेक राजकारणी अशा उत्सवांना भेट देतात. या वर्षी महापालिका निवडणूक असल्याने त्यात अधिक भर पडल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. मागील अनेक वर्ष मुंबई महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व आहे. ते टिकवून ठेवण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर आहे. शिवसेना शिंदे गटाला त्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची इच्छा आहे तर कोणत्याही परिस्थितीत महापालिकेची सत्ता हस्तगत करण्याचा भारतीय जनता पक्षाचा निर्धार आहे.