- राज्य
- 'तुम्ही केली तर शाई फेक आणि आम्ही केला तर हल्ला का?'
'तुम्ही केली तर शाई फेक आणि आम्ही केला तर हल्ला का?'
शिवधर्म प्रतिष्ठानचे दीपक काटे यांचा संभाजी ब्रिगेडला सवाल
मुंबई प्रतिनिधी
आपण प्रवीण गायकवाड यांच्यावर केवळ शाई फेक केली. हल्ला केला नाही. शाई फेकण्याचा प्रकार संभाजी ब्रिगेडनेच सुरु केला आहे, असा आरोप करतानाच शिवधर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक काटे यांनी, तुम्ही केली तर शाईफेक आणि आम्ही केला तर जीवघेणा हल्ला का, असा सवाल संभाजी ब्रिगेडला केला आहे.
ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याच्या निषेधार्थ आपण अक्कलकोट येथे गायकवाड यांच्यावर शाई फेकली. नावात सुधारणा करण्यासाठी आम्ही दीड वर्ष वाट पाहिली. पत्रव्यवहार केला. आंदोलने केली. तांत्रिक अडचण होती तर त्याचवेळी कल्पना द्यायला हवी होती. नावात संभाजी महाराज लावू शकत नव्हते तर संभाजी राजे लावायला हवे होते, असे काटे म्हणाले.
या आंदोलनाशी भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध नाही. हे आंदोलन केवळ शिवधर्म प्रतिष्ठानचे आहे. भाजपा प्रदेश सचिव पदाचा माझा कार्यकाळ 2023 मध्ये संपुष्टात आला आहे. आपले अपयश लपविण्यासाठी भाजपचे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पुढे करायचे ही यांची जुनी सवय आहे, अशी टीकाही काटे यांनी केली.
शाई फेकीच्या प्रकारानंतर पुरोगामी विचारांच्या व्यक्ती आणि संस्था संघटनांना लक्ष्य केले जात असल्याची टीका करण्यात आली. मात्र, गायकवाड हे प्रत्यक्ष पुरोगामी नसून प्रतिगामी आहेत, असा दावा काटे यांनी केला. त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडने शिवधर्माची स्थापना केली आहे. त्यामुळे ते मराठे राहिलेच कुठे, असा सवालही त्यांनी केला.