- राज्य
- महादेवीला परत आणण्यासाठी सरकार घेणार पुढाकार
महादेवीला परत आणण्यासाठी सरकार घेणार पुढाकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
नांदणी गावातील मठात असलेल्या महादेवी या हत्तीणीला वनतारा प्राणी केंद्रातून पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तब्बल तीस वर्षापासून नांदणी मठात असलेल्या महादेवीची रवानगी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील वनतारा या प्राणी केंद्रात करण्यात आली आहे. कोल्हापूरकरांचा या निर्णयाला प्रखर विरोध असून तो विविध मार्गाने व्यक्त करण्यात आला आहे.
कोल्हापूरकरांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, प्रकाश आवाडे, सदाभाऊ खोत आणि नांदणी मठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महादेवीला वनचारा येथे नेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आला असून त्याचा राज्य सरकारशी काहीही संबंध नाही, याची जाणीव करून देतानाच फडणवीस यांनी या प्रश्नावर मार्ग काढण्याचा उपाय सांगितला. ते म्हणाले, नांदणी मठाने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. सरकार देखील यासंबंधी एक याचिका दाखल करेल. महादेवी ची सर्व प्रकारची काळजी घेण्याची जबाबदारी सरकार स्वीकारेल. तिच्या वैद्यकीय उपचारांसाठी तज्ज्ञांचे पथक नियुक्त केले जाईल. तिची दैनंदिन व्यवस्था आणि खानपान सरकारच्या देखरेखी खाली केली जाईल, याबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयाला आश्वस्त करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.