- राज्य
- 'मावशी बरोबर गप्पा मारण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर'
'मावशी बरोबर गप्पा मारण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर'
उद्धव- राज भेटीबाबत संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दिलेली भेट राजकीय स्वरूपाची नव्हती तर कौटुंबिक स्वरूपाची होती. राज ठाकरे यांच्या मातोश्री, अर्थात उद्धव ठाकरे यांच्या मावशींनी बोलावल्याप्रमाणे उद्धव यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यावेळी गर्दी असल्यामुळे बोलता आले नाही. त्यामुळे, तू परत ये, असे उद्धव यांच्या मावशींनी, अर्थात राज यांच्या मातोश्री ह सांगितल्यामुळे ही भेट झाली, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.
वास्तविक, आज पार पडलेली राज आणि उद्धव ठाकरे बंधूंची बैठक राजकीय स्वरूपाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर होत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे यांची युती होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत युतीच्या दृष्टीने राजकीय चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, या सर्व शक्यता राऊत यांनी फेटाळून लावल्या आहेत. आपण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. हे आपल्याला माहिती आहे, असा दावा त्यांनी केला.