- राज्य
- 'राजकीय स्वार्थासाठी भावनांचा गैरवापर नको'
'राजकीय स्वार्थासाठी भावनांचा गैरवापर नको'
भाऊसाहेब आंधळकर यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
पुणे: प्रतिनिधी
नांदणी मठातून वनातारा प्राणी केंद्रात नेण्यात आलेल्या महादेवी हत्तीण पुन्हा स्वगृही आणण्याचा विषय न्यायालयीन प्रक्रियेने मार्गी लावण्याऐवजी काही राजकीय नेते या मुद्यावर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी जनभावना भडकवण्याचे काम करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्यातील मुख्य चेहरा आहेत, असा आरोप निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी केला.
राजू शेट्टी यांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. राजू शेट्टी यांनी एप्रिल २०१८ मध्ये वनविभागाला पत्र लिहून हत्ती सांभाळण्याची व्यवस्था नसल्याचे मान्य केले होते व हत्तीचा ताबा घेण्याची विनंती केली होती. यामुळेच पेटा सारख्या संघटनांचे लक्ष वेधून घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतरच्या घटनांचा रोख राजू शेट्टी यांच्या पत्रामुळेच बदलला. आज, तेच राजू शेट्टी आपल्यालाच माधुरीवरील प्रेमाचे प्रदर्शन करताना दिसतात.
शेट्टी यांचे २०१८ मधील पत्र आणि पेटा प्रतिनिधींसोबतचे त्यांचे फोटो देखील सार्वजनिक झाले आहेत, त्यामुळे आता ते स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी विविध अफवा पसरवत आहेत. त्यांनी हत्तीचा तात्पुरता ताबा घेण्याचे पत्र दिले, पण ते पत्र कुठेही "परत घेऊ" अशी भाषा वापरत नाही. यामुळे त्यांची भूमिका स्पष्टपणे दुटप्पी आणि भ्रामक आहे. पेटावर दोन कोटींचा आरोप करत अफवा पसरवणे ही जबाबदारीशून्य आणि दिशाभूल करणारी वागणूक आहे, अशी टीका आंधळकर यांनी केली.
राजू शेट्टी यांचा मोर्चा की केवळ स्टंट?
राजू शेट्टी यांनी रविवारी कलेक्टर ऑफिस बंद असतानाही तेथे मोर्चा नेण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. मोर्चात त्यांच्या अंगावर माधुरीचा फोटो असलेला बनियन होता, परंतु इतर कार्यकर्त्यांकडे तो नव्हता. हे स्पष्टपणे दर्शवते की, हा मोर्चा केवळ राजकीय पुनर्वसनाचा स्टंट होता, असा आरोप त्यांनी केला.
माधुरीच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना आंधळकर म्हणाले की, जैन समाजाच्या भावना आम्हाला माहीत आहेत. नांदणी मठ हे श्रद्धास्थान असून महादेवी हत्ती हा त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. सरकारने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून तामिळनाडू राज्यात आपली परंपरा, संस्कृती या अन्वयी पिढ्यानपिढ्या चालणारा जल्लीकट्टू सारख्या खेळावर सुद्धा या पिटाबीसारख्या संघटनांनी तक्रार केल्याने मद्रास हायकोर्ट 2014 बंदी आणली व 2017, 2018 मध्ये या ठिकाणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने 2023 ला जलीकट्टू व बैलगाडा शर्यत हा खेळ आहे हे मान्य करून बंदी उठवली. या घटनांचे उदाहरण घेऊन कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी आंधळकर यांनी केली.
महादेवी उर्फ माधुरी हिला नंदनी मठात परत आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. कोणताही राजकीय पक्ष किंवा नेते यावर राजकारण करत असतील, तर जनता त्यांना योग्य धडा शिकवेल. राजू शेट्टी यांच्यासारख्या नेत्यांनी जर जनभावनांचा फक्त राजकीय स्वार्थासाठी वापर केला, तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आंधळकर यांनी दिला.