- राज्य
- 'आंदोलनस्थळी झालेला युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे'
'आंदोलनस्थळी झालेला युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे'
संभाजी ब्रिगेडची राज्य व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
पुणे: प्रतिनिधी
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या ठिकाणी एका आंदोलक युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. त्याविरोधात संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत राज्य व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
आंदोलनस्थळी विजय घोगरे (तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर) या युवकाचा ३० ऑगस्ट रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला. प्रशासनाने आंदोलकांना आवश्यक त्या प्राथमिक, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात अक्षम्य गलथानपणा केल्यामुळेच हा मृत्यू झाला असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे.
पिण्याचे व इतर वापरासाठी पाणी पुरवठा, शौचालये व अन्य स्वच्छता सुविधा, वैद्यकीय सुविधा व रुग्णवाहिका, पाऊस व अन्य नैसर्गिक स्थितीत संरक्षण, वीज पुरवठा व अन्य प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रशासनाकडून सपशेल दुर्लक्ष करण्यात आले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या आंदोलनाची राज्य सरकार आणि मुंबई प्रशासनाला पूर्वकल्पना होती. या आंदोलनासाठी त्यांच्याच संबंधित घटकांनी परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे आंदोलनात झालेला मृत्यू हे जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असा आरोप तक्रारी करण्यात आला आहे.
घोगरे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी. त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध विभागांतर्गत कारवाई करण्यात यावी. मृताच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत दिली जावी आणि भविष्यकाळात कोणत्याही आंदोलन स्थळी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे संबंधित प्रशासकीय संस्थांना अनिवार्य करावे, अशा मागण्या देखील संभाजी ब्रिगेडने केलेल्या तक्रारीत करण्यात आले आहेत.