मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर

वडगाव मावळ/ प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटी-स्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. आबिटकर यांनी यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे निर्देश दिले असून, संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

*आमदार सुनील शेळके यांचा ठाम पाठपुरावा: मावळसाठी ठोस निर्णय*

हे पण वाचा  '... म्हणून शरद पवार यांना आला ओबीसींचा कळवळा'

या बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्टपणे सांगितले. वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील रुग्णालयांमध्ये अनेक सुविधांची कमतरता असून, ती तातडीने भरून काढावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या महत्त्वाच्या सुविधांना मंजुरी मिळाल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनीही मान्य केले.

लोणावळ्यातही डायलेसिस सेंटर आणि सिटी-स्कॅन सेंटर मंजूर

लोणावळा उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तसेच सिटी-स्कॅन सेंटरचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या. यामुळे परिसरातील गंभीर रुग्णांना पुण्याला जावे लागणार नाही, अशी नागरिकांमध्ये प्रतिक्रिया उमटली.

रुग्णसेवेत अडथळा ठरणारी रिक्त पदे भरण्यासाठीही ठोस पावले उचलण्यात आली. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी पदांवर भरती तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले, तसेच पदनिर्मिती संदर्भातील प्रस्तावावर आरोग्यमंत्र्यांनी त्वरित सही केली.

या बैठकीस आरोग्य उपसचिव   धुळे, आरोग्य संचालक अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत, उपसंचालक नागनाथ यमपल्ले, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता धनराज दराडे, वैद्यकीय अधीक्षक आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मावळ तालुक्यासाठी ही बैठक ऐतिहासिक ठरली असून, आमदार सुनील शेळके यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि पाठपुराव्यामुळे आरोग्य सेवांच्या विस्ताराला नवा आयाम मिळाला आहे. हे निर्णय प्रत्यक्षात आल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

Advt