- राज्य
- 'यापुढे ओबीसींनी ओबीसींना मतदान करावे'
'यापुढे ओबीसींनी ओबीसींना मतदान करावे'
नवनाथ वाघमारे यांचे समाजाला आवाहन
बीड: प्रतिनिधी
यांना आमचा ग्रामपंचायत सदस्य देखील चालत नसेल तर आम्हाला यांचा आमदार चालणार नाही. यापुढे इतर मागासवर्गीय यांनी इतर मागासवर्गीय उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केले. बारामतीच्या करामतीने इतर मागासवर्गीयांना अडचणीत आणण्यासाठी अडचणीत आणण्यासाठी अंतरवली सराटी येथून आंदोलन सुरू केले, असा आरोपही त्यांनी केला.
मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणाचे आरक्षण देण्यासाठी आम्ही कधीही विरोध केला नाही. मात्र, शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन घडवून आणले. आता आम्ही तरी किती वेळ शांत बसणार? आता करो या मरो, ही परिस्थिती येऊन ठेपली आहे, असेही वाघमारे म्हणाले.
भारतात संविधानाला मान्यता असताना हैदराबाद गॅझेटियर कसे लागू केले जाऊ शकते? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असताना निजामाचे गॅझेट कसे लागू होते, असे सवाल वाघमारे यांनी केले. इतकी वर्ष धनगर आणि बंजारा समाज आंदोलन करत असताना हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचे सुचले नाही का, अशी विचारणाही त्यांनी केली
दलित, मुस्लिम आणि ओबीसी यांनी एकत्र येणे आवश्यक
बीडची नेतेमंडळी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्या मंचावर जाऊन पाठिंबा व्यक्त करतात. राज्यात आता दलित, मुस्लिम आणि ओबीसी यांनी एकत्र येणे ही काळाची गरज बनली आहे. आतापर्यंत आपल्याला कोणी त्रास दिला हे मुस्लिम समाजालाही कळले पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील ओबीसी आरक्षण स्वतंत्र राहिले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. मागील दोन वर्षात जी कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली, त्याची चौकशी केली जावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. आमच्या आंदोलनाला पंकजा आणि धनंजय मुंडे यांचा पाठिंबा आहे, असा दावा वाघमारे यांनी केला.
दसऱ्यानंतर मुंबईला धडक
दसरा मेळावा झाल्यानंतर सर्वांशी चर्चा करून आपल्याला मुंबईला धडक द्यायची आहे. नाक दाबल्याशिवाय सरकारचे तोंड उघडणार नसेल, सरकारला जर झुंडशाहीची भाषाच कळणार असेल तर आपणही झुंडशाहीच करू. ओबीसी समाज मुंबईत धडकला तर या सरकारला कुठे पळावे ते देखील कळणार नाही, असेही ते म्हणाले.