आगाशिव डोंगराला वन पर्यटनस्थळ बनविण्यासाठी प्रयत्नशील - डॉ. सुरेश भोसले

आगाशिव डोंगराला वन पर्यटनस्थळ बनविण्यासाठी प्रयत्नशील - डॉ. सुरेश भोसले

कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पअंतर्गत वृक्षारोपण, ८ हेक्टरवर राबविला प्रकल्प

कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाने वन विभागाच्या सहकार्याने कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पअंतर्गत आगाशिव डोंगरावर गेल्या ७ वर्षांत हजारो रोपांची लागवड केली आहे. हा परिसर जैवविविधतेने संपन्न व्हावा, यासाठी कृष्णा विश्व विद्यापीठ प्रयत्नशील आहे. तसेच येत्या काळात आगाशिव डोंगराला वन पर्यटनस्थळ बनविण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

आगाशिव डोंगरावर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, या सामाजिक जाणिवेतून कृष्णा विश्व विद्यापीठाने कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २०१८ पासून कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पराबविण्यास प्रारंभ केला. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वनविभागाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगाशिव टेकडीवर हजारो देशी झाडांचे रोपण व संवर्धन करण्यात आले असून, यामुळे टेकडीचा परिसर हिरवागार बनत चालला आहे.

वृक्षारोपणप्रसंगी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे परिक्षेत्र वनअधिकारी संग्राम गोडसे आणि ललिता पाटील यांच्या हस्ते आज आगाशिव डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध देशी रोपांची लागवड करण्यात आली.

हे पण वाचा  प्रीतिसंगम बागेतील घोणस सर्पाचा उपद्रव संपला

याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, २०१८ साली हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि त्याला आता चांगले यश मिळताना दिसत आहे. अनेक वृक्षांची चांगली वाढ झाली आहे. खरंतर डोंगरावर झाडे लावणे सोपे नाही. डोंगरावर पाणी आणणे, झाडांसाठी चांगली माती आणणे आणि रोपांची राखण करणे अशी अनेक आव्हाने आणि अडथळे पार करत, या झाडांचे संगोपन करण्यात आले. सध्या वन विभागाच्या ८ हेक्टर जागेत हा प्रकल्प राबविला जात आहे. वनविभागाने आणखी जागा उपलब्ध करुन दिल्यास, या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे.

यावेळी परिक्षेत्र वनअधिकारी संग्राम गोडसे आणि ललिता पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना कृष्णा विश्व विद्यापीठाचे विशेष कौतुक केले. वन विभागापेक्षाही अधिक यशस्वीपणे कृष्णा विद्यापीठाने वृक्षारोपण मोहिम यशस्वी केली असून, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आगाशिव डोंगर हिरवागार बनला आहे. येत्या काळातही वन विभागाचे शक्य ते सहकार्य विद्यापीठाला राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या प्रकल्पाच्या समन्वयक अर्चना कौलगेकर यांनी प्रास्ताविकात कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देत, भारतीय देशी प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण आणि सेंद्रीय खतांच्या वापरावर विशेष भर दिल्याचे आवर्जून नमूद केले. कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिलेल्या भक्कम पाठबळामुळे आणि स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे हा प्रकल्प यशस्वीतेकडे वाटचाल करत असल्याचे नमूद केले.

या वृक्षसंगोपन कार्यक्रमात विशेष योगदान देणाऱ्या कृष्णा फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शुभांगी पाटील व विद्यार्थ्यांना डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, कराड आर्किटेक्ट ॲन्ड इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील, सेक्रेटरी राजेंद्र जाधव, खजानिस मोहन चव्हाण व अन्य पदाधिकारी, कृष्णा विद्यापीठाचे कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते, डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. शशिकिरण, डॉ. एन. आर. जाधव, राजेंद्र संदे, शशिकांत गायकवाड, शिवाजी पाटील यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेनेचे (एन.सी.सी.) कॅडेटस्‌ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सह्याद्रीच्या बफर झोनमध्ये आरोग्य शिबीर

अत्यंत दुर्गम भागात असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील अनेक गावांमध्ये कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन होत असल्याची माहिती परिक्षेत्र वनअधिकारी संग्राम गोडसे यांनी दिली. गेल्या दोन वर्षांत २५ शिबीरांच्या माध्यमातून सुमारे २३०० लोकांना याचा लाभ झाल्याचे स्पष्ट करत, कृष्णा हॉस्पिटलने या लोकांना उच्चदर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt