प्रीतिसंगम बागेतील घोणस सर्पाचा उपद्रव संपला
सर्पमित्र मयूर लोहाना यांनी घोणस सर्पास पकडले, नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास
कराड : शहरातील प्रीतिसंगम बागेत गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या विषारी घोणस सर्पास अखेर बुधवारी सर्पमित्र मयूर लोहाना (बबलू) यांनी यशस्वीरित्या पकडले. या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
सध्या प्रीतिसंगम बागेत नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून गवत कटाईचे काम सुरू आहे. या कामादरम्यान बागेतील झुडपांमध्ये लपून बसलेला मोठा घोणस सर्प आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र मयूर लोहाना (बबलू) घटनास्थळी दाखल झाले आणि त्वरित दक्षता घेत सापाला जिवंत पकडले. विशेष म्हणजे, या घोणस सर्पासोबत त्याची पिल्लेसुद्धा परिसरातील बाग पतीसारात आढळून आली होती, ज्यामुळे परिसरातील धोका अधिक वाढला होता.
गेल्या दोन महिन्यांपासून या बागेत सापांचा वावर वाढलेला असून आतापर्यंत विविध जातीचे सुमारे २५ पेक्षा जास्त साप पकडण्यात आले आहेत. त्यामध्ये घोणस सर्पाच्या पिल्लांनसह काही विषारी सापही होते. त्यामुळे बागेत फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलं, व्यायामासाठी येणारे नागरिक, तसेच परिसरातील महिला या सगळ्यांना सतत सर्पाच्या धास्तीने बागेत जाणं टाळावं लागत होतं.
मयूर लोहाना व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने दक्षता बाळगत बागेतून सापांचा शोध घेत त्यांना सुरक्षितपणे पकडण्याचे काम केले. साप पकडल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे काळजी घेत त्यांची रवानगी नैसर्गिक अधिवासात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या कामगिरीबद्दल कराड शहरातील व परिसरातील नागरिकांकडून सर्पमित्र मयूर लोहाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. लोकांनी त्यांच्या धाडसाचे आणि सेवाभावाचे कौतुक करत समाज माध्यमांवरूनही त्यांचे अभिनंदन होत आहे. सर्पमित्र मयूर लोहाना यांनी वेळेवर केलेल्या या कारवाईमुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे.
000