आषाढी एकादशीनिमित्त बापूसाहेब शिंदे विद्यालयाची पायी दिंडी उत्साहात पार
पसरणी : पश्चिम भागातील चिखली मोरजीवाडा येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिनांक ५ जुलै २०२५ रोजी बापूसाहेब शिंदे माध्यमिक विद्यालयात पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मोरजीवाडा ते चिखली येथील चवनेश्वर मंदिरापर्यंत ही दिंडी पार पडली.
श्री सावळाराम शिंदे (नाना) यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलीच्या मूर्तीचे पूजन होऊन पालखी प्रस्थान झाली. प्रारंभी विद्यार्थ्यांनी गोल रिंगण व लेझीम सादर केली. मुगाव येथे विद्यार्थिनींनी फुगड्या घालून वातावरण भक्तिमय केले. चिखलीमध्ये टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखीचे स्वागत झाले.
चवनेश्वर मंदिरात पालखी विसावली असून, पसायदानाने दिंडीची सांगता करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सुनील वाडकर, प्रमोद वाडकर, रवींद्र गायकवाड, श्री. नाईकवडी, राजेश सोंडकर, चंद्रकांत वैराट आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू व शिरा वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री. गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.
000