कराड तालुक्यात बेंदूर सण उत्साहात साजरा
बळीराजाची लगबग; शहरात बालचमुंनी काढली पावसात भिजत मिरवणूक
कराड : कराड शहरासह तालुक्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणासाठी आठ दिवस आधीच शेतकऱ्यांची लगबग पहावयास मिळाली. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ आकर्षक वेलबुट्ट्याच्या रेशमी झुली, बाशिंगे, पितळी शेंब्या, रंगीबेरंगी फुले व घुंगरांनी सजलेल्या बाजारपेठ पूर्वसंध्येला शेतकऱ्यांनी गजबजून गेली होती.
महाराष्ट्रात आषाढ महिन्यात वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणार्या बैलांच्या कौतुकाचा हा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र, अलिकडच्या काळात शेतामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असल्याने बैलांची संख्याही कमी होत गेली आहे. असे असले तरी बैलांना पूजण्याचा दिवसाची शेतकरी वाट बघत बेंदूर साजरा करण्यासाठी बळीराजा उत्सुक असतो. त्यात महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यती मोठ्याप्रमाणात सुरू असल्याने बैलांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. या लाडक्या बैलाला शेतकरी व बैलगाडा मालक हे घरातील सदस्याप्रमाणे सांभाळ करतात.
बैलपोळ्याचा उत्सव साजरा करताना आदल्या दिवशी बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकून तेल व हळदीने खांद मळणी केली जाते. मुख्य म्हणजे आजच्या दिवशी बैल सजवण्यासाठी नवीन कासर्यापासून बेंदरासाठी लागणारे सर्व साहित्य बैलाच्या अंगावर घालण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू होती.
कराड शहरासह काले, विंग, ओगलेवाडी, मसूर, उंब्रज, वाठार, रेठरे, आटके, ओंड, उंडाळे यासह अन्य गावांतील बळीराजाने बैलांना सजवण्यासाठी आकर्षक रेशमी झुली, भिंगाची बाशिंगे, पितळी शेंब्या, रंगीबेरंगी फुलाचे हार, तोडे, गळ्यात व पायात छमछमणार्या घुंगराच्या अन् फुलांच्या माळा, काळ्या कंठ्यात गुंफलेल्या पितळी घंट्या, कासरे, गोंडे, कवडी माळा, तिरंगा माळ यासह विविध सजावटीच्या वस्तूंनी बैलांना सजवले होते. त्यांना पुराण पोळीचा नेवैद्य खाऊ घालून काही ठिकाणी सर्जा - राजाचे कौतुक करण्यासाठी गावातून मिरवणूकही काढण्यात आली. बुधवारी सायंकाळी सात वाजण्याची सुमारास कराड शहरांमध्ये देखील बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान, दुपारी शहरातील विविध मंडळांच्या बालचमुंनी ढोल ताशा व डॉल्बीच्या तालावर पावसात भिजत बैलांच्या मूर्तीची मिरवणूक काढली. एवढे गुलालाची उजळणी करण्यात आली. एकंदरीत या सणानिमित्त बळीराजाचा आनंद व उत्साह दिसून आला.
000