- राज्य
- राज्यकर्त्यांना घेण्यासाठी विरोधकांनी कसली कंबर
राज्यकर्त्यांना घेण्यासाठी विरोधकांनी कसली कंबर
मातोश्रीवर महाविकास आघाडीची बैठक सुरू
मुंबई: प्रतिनिधी
मागील काही काळात राज्यात घडलेल्या सामाजिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला घेण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी महाविकास आघाडीची तातडीची बैठक सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देखील बैठकीला उपस्थित आहेत. राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या आणि अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरून राज्यभर मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.
बदलापूर सह राज्यभरात अनेक ठिकाणी घडलेल्या लहान मुली आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना, मालवणच्या राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळल्याची घटना, वाढती गुन्हेगारी, जाती जातींमध्ये वाढत जाणारा तणाव अशा मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा सुरू असून याच मुद्द्यांवरून राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीला घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून पुढील काळात आक्रमक पावल उचलली जाणार हे निश्चित आहे.