- राज्य
- देवाच्या नावावर लूटमार करणाऱ्यांना सोडणार नाही: फडणवीस
देवाच्या नावावर लूटमार करणाऱ्यांना सोडणार नाही: फडणवीस
शनि शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त
मुंबई: प्रतिनिधी
देवाच्या नावावर लूटमार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले शनि शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याची घोषणा केली. देवस्थानचा कारभार शासननियुक्त मंडळाकडे सोपविण्यात येणार आहे.
देश विदेशातील भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या शनि शिंगणापूर मंदिराच्या कारभारात १०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी केला आहे तर आमदार सुरेश धस यांच्या मते हा घोटाळा ५०० कोटींचा आहे.
ज्या गावात चोरी होत नाही म्हणून दाराला कडी, कुलुपे नाहीत, त्याच गावातील देवस्थानच्या विश्वस्तांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांना लुटल्याचा आरोप आहे. विश्वस्त मंडळाने तीन, चार मोबाईल ऍप्लिकेशन्स तयार करून त्यावर पूजा, अभिषेक, देणग्यांच्या नावावर भक्तांकडून ऑनलाइन पैसे जमा केले. या अँप्सवर तब्बल चार लाख भाविकांनी पैसे पाठवले. हे पैसे देवस्थानात जमा न करता परस्पर लाटल्याचा आरोप आहे. आमदार लंघे यांनी कर्मचारी भरती प्रक्रियेत देखील विश्वस्त मंडळाने पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले असून या घोटाळ्याची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विश्वस्तांप्रमाणेच देवस्थानचे अधिकारी, कर्मचारी आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे.