बहिणी केवळ लाडक्याच नाही तर प्रामाणिकही
तब्बल चार हजार महिलांनी घेतली योजनेतून माघार
मुंबई: प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्रतेच्या निकषात नसणाऱ्या तब्बल चार हजार महिलांनी या योजनेतून वगळण्याची विनंती करणारे अर्ज केले आहेत. अशाप्रकारे बहिणी केवळ लाडक्याच नाहीत तर प्रामाणिक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या उत्पन्नाची व अन्य पात्रतेची पुन्हा पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे, ज्या महिलांकडे केवळ दुचाकीच नाही तर चार चाकी गाड्या आहेत आणि ज्यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांबाबत तक्रारी आल्यावर पाच मुद्द्यांच्या आधारे महिलांच्या पात्रतेची पुन्हा पडताळणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मात्र, आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही, असे लक्षात आल्यावर चार ते साडेचार हजार महिलांनी या योजनेचे लाभ परत केले आहेत. अशा महिलांकडून डिसेंबर महिन्यात काही रक्कम सरकारी तिजोरीत जमा झाली असून जानेवारी महिन्यातही महिला या योजनेअंतर्गत मिळालेल्या निधी परत करीत आहेत. तसेच अनेक महिला योजना सुरू झाल्यानंतर विवाह करून परराज्यात गेल्या आहेत. अशा महिलांनी देखील आपण या योजनेसाठी पात्र नाही, हे स्वतःहून पुढे येऊन सांगितले आहे, अशी माहिती देतानाच तटकरे यांनी या प्रामाणिक महिलांचे आभार मानले आहेत.
सध्या अडीच कोटी महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यापैकी दीड कोटी महिलांचे उत्पन्न एक लाखापेक्षाही कमी असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार नाही. ज्यांचे उत्पन्न निकषापेक्षा अधिक असल्याची शंका आहे, त्यांचीच पुन्हा पडताळणी केली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले. ज्या महिलांना आपण निकषात बसत नसल्याची माहिती मिळेल त्यांनी स्वतः पुढे येऊन या योजनांचा लाभ नाकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Comment List