- देश-विदेश
- महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी होणार नव्या पक्षाची स्थापना
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी होणार नव्या पक्षाची स्थापना
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची घोषणा
पटना: वृत्तसंस्था
महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी आपल्या जनसुराज चळवळीचे रूपांतर राजकीय पक्षात करणार असल्याची घोषणा निवडणूक रणनीती कार प्रशांत किशोर यांनी केली आहे. बिहार राज्यात परिवर्तन घडविणे, हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये जनसुराज अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या तब्बल दीड लाख कार्यकर्त्यांच्या राज्यपातळीवरील सात बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकांच्या माध्यमातून राजकीय पक्षाची स्थापना करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या औपचारिकतेची पूर्तता, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि संघटनात्मक बांधणी ही कामे केली जाणार आहेत.
जातीपातीत विभागलेला बिहार राजकीय पक्षाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे आपले उद्दिष्ट आहे. जनसुराज राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात येईल त्यावेळी राज्यातील तब्बल एक कोटी लोक त्यात सहभागी होतील, असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर जनसुराज पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. केवळ 25, 30 जागांवर आपले उमेदवार निवडून आणणे, एवढे आमचे मर्यादित उद्दिष्ट नाही. बिहारचा चेहरा मोहरा बदलून टाकणे हा आमचा उद्देश आहे, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.
कंदीलात रॉकेल शिल्लक राहणार नाही
पक्षाची स्थापना झाल्यापासून केवळ दोन वर्षाच्या आत आपला पक्ष जनमानसात महत्त्वाचे स्थान प्राप्त करेल. त्यामुळे राज्यात अस्तित्वात असलेल्या तीन प्रमुख राजकीय पक्षांना फारसे अस्तित्व राहणार नाही. विशेषतः राष्ट्रीय जनता दलाचा केवळ कंदील शिल्लक राहील मात्र त्यात घालण्यासाठी रॉकेल शिल्लक राहणार नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले.