... या कटात अजित पवार यांचे लोक सहभागी
ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक आरोप
मुंबई: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन केवळ आरक्षणापुरते मर्यादित नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. या कटात केवळ विरोधी पक्षच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार आणि खासदार सहभागी आहेत, असा खळबळजनक आरोप इतर मागास प्रवर्गाचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी केला
राज्यात सध्या झुंडशाही सुरू आहे. मनोज जरांगे या काडेपेटीचा ज्वालामुखी निर्माण करण्यात आला आहे जरांगे हे सरकार किंवा न्यायालयाला ही जुमानत नाहीत. झुंडशाहीच्या जोरावर ते आपल्या मागण्या पुढे रेटत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर राज्यातील ओबीसी रचना पूर्णपणे उध्वस्त होणार आहे, असे प्रा हाके म्हणाले.
जरांगे यांना विरोधकांकडून मदत मिळत आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या गटातील आमदार आणि खासदार देखील जरांगे यांना रसद पुरवत आहेत. फडणवीस यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींची पुण्यात बैठक होणार असून या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असेही प्रा हाके यांनी सांगितले. ओबीसी आरक्षण सुरक्षित रहावे यासाठी ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी. अन्यथा ओबीसी समाज या मंत्र्यांना कदापी माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.