- राज्य
- 'ट्रम्प यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राजकारणातील जोकर'
'ट्रम्प यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राजकारणातील जोकर'
शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी
मुंबईतील धारावीसह अनेक महत्त्वाचे भूखंड उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात घालणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उलट आमच्यावरच महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप करतात, हा मोठा विनोद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर फडणवीस हेच राजकारणातले जोकर आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
जांबोरी मैदानावरील परिवर्तन दहीहंडीला भेट दिल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकीत परिवर्तन अटळ असून भ्रष्टाचारांची हंडी फुटणार आणि विकासाची हंडी लागणार, अशा शब्दात दीर्घकाळ महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या आरोपाला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महापालिका आमच्या ताब्यात असताना महापालिकेच्या 90 हजार कोटी रुपयांच्या ठेवी बँकेमध्ये जमा करण्यात आल्या. तुमच्या सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनीच महापालिकेत भ्रष्टाचार केला आणि या ठेवी गिळल्या, असा आरोप राऊत यांनी केला. भ्रष्टाचार करणारे तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत. तुमच्या आजूबाजूला असलेले चोर, लफंगे,दरोडेखोर यांना पाठीशी घालू नका. अन्यथा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी फडणवीस यांना दिला.
राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. कोणाला कोणती कामे दिली गेली याचा पत्ता नाही. मात्र दोन लाख कोटी रुपयांच्या कंत्राटाचे 25 टक्के कमिशन ज्या लोकांपर्यंत पोहोचले आहे त्या लोकांमध्ये फडणवीस यांच्या लोकांचाही समावेश आहे, असा आरोप देखील राऊत यांनी केला.