- राज्य
- केजरीवाल करणार महाविकास आघाडीचा प्रचार
केजरीवाल करणार महाविकास आघाडीचा प्रचार
शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या विनंतीला देणार मान
मुंबई: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या, प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
इंडी आघाडीमध्ये काँग्रेस सह शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हे आम आदमी पक्षाचे सहयोगी पक्ष आहेत. महायुतीला, पर्यायाने भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून दूर करण्यासाठी केजरीवाल यांनी महाराष्ट्रात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सहभाग घ्याव्या, अशी विनंती ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. या विनंतीला मान देऊन केजरीवाल राज्यात विभागवार सभा घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
दिवाळीनंतर मोदींच्या सभांचा धडाका
महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यभर सभा होणार आहेत. दिवाळीनंतर या सभांचे आयोजन केले जाणार असून त्याचे वेळापत्रक आखण्याचे काम सुरू आहे. दिवाळीनंतर प्रचाराला फार कालावधी शिल्लक नसल्याने मोठ्या संख्येने सभा घेता येणार नाहीत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील सर्व विभागात एकत्रित सभा घेण्यात येणार आहेत.